बिल्डरच्या मातीभरावामुळे नैसर्गिक नाला बंद; पहिल्याच पावसात घरात पाणी शिरण्याची भीती
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावाच्या हद्दीलगत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीतील खांडा परिसरातील अचानक नगर येथील रहिवाशांवर पावसाळ्यापूर्वीच संकटाचे सावट निर्माण झाले आहे. परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पासाठी बिल्डरकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या मातीभरावामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास पहिल्याच पावसात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कर्जत-नेरळ-कल्याण राज्य मार्गालगतून वाहणारा नैसर्गिक नाला ममदापूर ग्रामपंचायतीतील खांडा भागातून पुढे जातो. मात्र, ‘अलायन्स ग्रुप’ या बांधकाम व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे हा नाला अडवण्यात आला आहे. नाल्याच्या जागी मोठ्या प्रमाणावर माती व दगड टाकण्यात आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे थांबला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे अचानक नगर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, पावसाळ्यात डोंगर व उंच भागातून येणारे पाणी थेट घरांमध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वित्तहानीसह जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर अचानक नगरमधील रहिवाशांनी एकत्र येत कर्जत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नेरळ विकास प्राधिकरणाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी तातडीने पर्यायी जलनिस्सारण व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिल्डरने बांधकाम सुरू करताना स्थानिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार केलेला नाही. नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद करूनही पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित बिल्डरवर तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नैसर्गिक नाला पूर्ववत करावा किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम व्यवस्था उभी करावी; अन्यथा अचानक नगरमधील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.






