| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
देशातील युवकांनी नीट पेपर फुटीविरोधात खूप मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनातून युवकांनी सरकारचा अहंकार मोडला होता. ईव्हीएमबाबत अनेकांना संभ्रम आहे. आगामी काळात हेच युवक एकत्र येऊन ईव्हीएमविरोधात लढा देणार आहेत. बॅलेट पेपरवर मतदान केले जावे, अशी युवकांची मागणी आहे, त्यामुळे ईव्हीएमविरोधात युवक निश्चित आंदोलन छेडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रसचे आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला. पत्रकारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, अभिजीत दिपके यांनी दिल्लीमध्ये एक चांगला लढा पुकारला होता. या लढ्यातून अहंकारी सरकारला नमविण्याचे काम युवकांनी केले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी खिळे असलेल्या लाठीने हल्ला केला. पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. फक्त सोशल मीडियावर रिल चालावी म्हणून भावना व्यक्त केली असेल, तर ते चुकीचे आहे. मात्र, मोदींच्या या रिलवर युवकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
पूर्वीचे पंतप्रधान पत्रकारांसोबत संवाद साधत होते. परंतु, आताचे पंतप्रधान रिलवर बोलतात, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. ते म्हणाले की, मॉर्डन आणि वेस्टन विचार देशासाठी योग्य नाही, असे अप्रचार भाजपची काही मंडळी करीत आहेत. परंतु, भाजपच्या मंत्र्यांची मुलेच अमेरिका, लंडन या देशांमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला माझा विरोध नाही. मात्र, भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.






