रायगडच्या घाटात बसचा अपघात
| महाड | प्रतिनिधी |
रायगड मार्गावर महाड तालुक्यातील पुनाडेवाडी गावाजवळ घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बस संरक्षण कठड्यावर अडकल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि आतमध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढले.
मुंबई -गोवा महामार्गावरती माणगाव या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहन चालक निजामपूर रायगड अशा मार्गाने प्रवास करत असतात. अशाच प्रकारे पालघर- ठाणे येथून 40 पर्यटकांना घेऊन निघालेली एक खाजगी बस निजामपूर मार्गे रायगड येथे जात असताना पुनाडे गावच्या हद्दीमध्ये घाटात उंच ठिकाणी एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस संरक्षण कठड्याला आदळून अपघात झाला. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली. अन्यथा बस जवळपास 600 ते 700 फूट दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. यावेळेस पुनाडे येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढून, त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करून त्यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पुनाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयेश लामजे यांनी दिली आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, सुदैवाने संरक्षण कठडा असल्याने सदर बसला मोठा अपघात होताना टळला असून, 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी महाड तालुका पोलीस घटनास्थळी गेले असता कोणाची तक्रार नसल्याने याप्रकरणी अपघाती गुन्हा दाखल होऊ शकला नाही.






