| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कुरमुर्ली येथे खंडणी, मारहाण, जबरी चोरी आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश रघुनाथ दळवी यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास कुरमुर्ली येथील फिर्यादी मयूर केसरीनाथ वनगे यांच्या फार्महाऊसमध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, पूर्वीच्या वैमनस्यातून मंगेश रघुनाथ दळवी, हरेश कृष्णा दळवी, रूपेश कृष्णा दळवी आणि रंजीत दळवी (सर्व रा. मांगरूळ) यांनी लोखंडी रॉड, पाईप, लाकडी दांडका आणि लोखंडी तलवारीचा वापर करून तक्रारदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर मंगेश दळवी यांनी जवळील रिव्हॉल्वर तक्रारदाराच्या कपाळावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच रिव्हॉल्वर तोंडात घालून धमकावल्याचेही फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेदरम्यान तक्रारदाराच्या खिशातून खाली पडलेले 80 हजार रुपये रूपेश दळवी यांनी उचलून घेतल्याचा, तर हरेश दळवी यांनी गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी दिली. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची पोलीस तपासातून शहानिशा होणार असून, या प्रकरणातील पुढील तपासात नेमकी काय तथ्ये समोर येतात आणि आरोपींवर कोणती कारवाई होते, याकडे पेण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कुटुंबाला ठार मारण्याची धमकी?
यापुढे आमच्या नादी लागल्यास तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश दळवी यांच्यावर यापुर्वीदेखील अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याविरोधात कुणीही बोलण्यास धजावत नाही. त्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा माझ्यासारख्या अनेकांच्या जीवास धोका आहे.
मयुर वनगे,
पिडित तक्रारदार







