| ढाका । वृत्तसंस्था ।
श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौर्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या सामन्यात चार खेळाडू जखमी झाले आहे. यातील दोन खेळाडूंना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढावे लागले, तर एकाची दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यालाही थेट रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला दुखापत झाली. मुस्तफिजुर रहमानला क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले. श्रीलंकेच्या डावात 42व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना तो मैदानावर पडला. यावेळी तो काहीशा अडचणीत दिसत होता. असे असूनही त्याने 48व्या डावात पुन्हा गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर तो पुन्हा मैदानावर पडला. त्यानंतर वैद्यकीय पथक मैदानावर आले आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढले.
यासोबत बांगलादेशचा यष्टिरक्षक जाकर अली याला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. झेल घेण्याच्या प्रयत्नात तो त्याचा सहकारी खेळाडू अनामुल हकशीला जाऊन धडकला, त्यामुळे तो जखमी झाला. यानंतर जाकर अलीलाही स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढण्यात आले. मात्र, त्याची दुखापत पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या सामन्यात मुस्तफिजुर रहमान आणि जाकेर अली यांच्याशिवाय आणखी दोन खेळाडू जखमी झाले. हे दोन्ही खेळाडू बांगलादेशचे आहेत. खरंतर, जाकर अलीशी टक्कर दिल्यानंतर अनामूल हकही जखमी झाला होता. त्याची दुखापत गंभीर नव्हती. याशिवाय सौम्या सरकारलाही क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. सौम्या सरकारही दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे. या सामन्याबद्दल बोलयचे झाले तर, श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 235 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 3 बळी घेतले, तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बांगलादेशने तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकला. तर श्रीलंकेने दुसरी वनडे जिंकली होती.