एसबीआयची तब्बल 41 लाखांची फसवणूक

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

नियमात नसतानाही कर्ज मंजूर करणे, खोटे वेतन पत्रक देणे, असा गैरप्रकार करून अलिबागमधील स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीबाग शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक, फिल्ड व्यवस्थापक व कर्जदारांनी बँकेची 41 लाख 67 हजार 667 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात 27 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्थानिकांसह ठाणे जिल्हा व गुजरात राज्यातील आरोपींचा समावेश आहे.

बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष यमगेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शैषव नलावडे हे 2 जुलै 2018 ते 24 मे 2021 या कालावधीत श्रीबाग येथील स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. तर, अमिताभ गुंजन हे फिल्ड ऑफिसर म्हणून होते. श्रीबाग एसबीआय शाखेचे ऑडिट 26 मे 2022 रोजी पुणे येथील ऑडिट विभागाकडून झाले. त्यामध्ये नलावडे आणि गुंजन या दोघांनी मिळून एक्स्प्रेस क्रेडिट लोन या योजनेंतर्गत 65 जणांना वेगवेगळ्या रकमेचे कर्ज मंजूर केल्याचे निर्दशनास आले. त्यामध्ये कर्जदार कर्ज मंजूर करण्याच्या कोणत्याही नियमात बसत नसतानाही त्यांचे कर्ज मंजूर झाल्याचे आढळून आले. खोटे वेतन पत्रक, बँक स्टेटमेंट देऊन त्यांच्याकडूही दिशाभूल करून वैयक्तिक कर्ज मिळविल्याचे निष्पन्न झाले.

यातील 38 जणांनी कर्जाची रक्कम पूर्ण भरून त्यांचे कर्जाचे खाते बंद केले. त्यापैकी 27 जणांनी खोटे दस्तऐवज देऊन कर्ज मिळविले. या 27 जणांची कोणतीही पडताळणी न करता कर्ज मंजूर करण्यामध्ये तत्कालीन शाखा व्यवस्थापक नलावडे व फिल्ड व्यवस्थापक गुंजन यांनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार या सर्वांनी 2018 पासून 2021 या कालावधीत केल्याची तक्रार यमगेकर यांनी केली आहे.

श्रीबागमधील स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर व 27 कर्जदारांविरोधात फसवणूक केल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. अजूनपर्यंत कोणाला ताब्यात घेण्यात आले नाही.

शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, अलिबाग

बँकेच्या ऑडिटमध्ये खोटे दस्तऐवज देऊन कर्ज मिळविणे, तत्कालीन शाखा व्यवस्थापक व फिल्ड ऑफिसर यांनी कोणतीही पडताळणी न करता संगनमताने कर्ज दिल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेची 41 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत 27 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष यमगेकर, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीबाग शाखा
Exit mobile version