| उरण | प्रतिनिधी |
उरण वनविभागाने उलवे नोड परिसरात मोठी धाड टाकत दुर्मिळ पक्ष्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. रेड मुनिया, स्कॅली मुनिया आणि ट्रायकलर मुनिया या मौल्यवान प्रजातींचे तब्बल 42 पक्षी जप्त करण्यात आले. याप्रकरणी देवेंद्र लालचंद पाटील (रा. कोपरखैरणे) आणि हरेश दामोदर पाटील (रा. पेण) या दोन तस्करांना अटक करून पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली.
गोपनीय माहितीच्या आधारे उरणचे वनपरीक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे, वनपाल संजय पाटील (दापोली), नारायण माने (जासई), तसेच वनरक्षक पांडुळे, खताळे, झेंडे, कार्ले, पाटील आणि रेंज स्टाफ यांच्या संयुक्त पथकाने ही धाड घातली. रात्री सुमारे नऊ वाजता आरोपी हे पक्षी विक्रीसाठी पिंजऱ्यात घेऊन आले असताना सापळा रचून कारवाई करण्यात आली. जप्त केलेले सर्व पक्षी वनविभागाने नंतर जंगलात सोडले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाचे हे पथक कार्यवाहीसाठी कौतुकास पात्र ठरले असले, तरी उलवे व आसपासच्या भागात दुर्मिळ पक्ष्यांची अशी उघड तस्करी नेमकी कोणाच्या आश्रयामुळे फोफावत आहे? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. प्रशासनाच्या नजरेआड होऊन पर्यावरणाशी खेळ करणारे हे माफिया आता उघड झाले आहेत.
वन्यजीवांची लूट थांबवा, अन्यथा मोठं जनआंदोलन उभारलं जाईल, असा इशारा स्थानिक पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
उलवेत दुर्मिळ 42 मुनिया पक्षी जप्त; तस्करांना कोठडी
