मुरूड समुद्रकिनारी 420 व्होल्टची डीपी खुली

विद्युत महामंडळाचे दुर्लक्ष

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर रोज शेकडो पर्यटक व स्थानिक नागरिक फिरायला येतात. परंतु, याच ठिकाणी विद्युत पुरवठा करणारी 420 व्होल्टेजची डीपी खुली आहे. या ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून परिसरातील 420 व्होल्टची डीपी अनेक दिवसांपासून उघडी पडलेली आहे. डीपीचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे आतल्या विद्युत तारा आणि यंत्रणा उघड्यावर दिसत आहेत. यामुळे परिसरातील लहान मुले, नागरिक तसेच जनावरे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक धोकादायक ठरत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने डीपी सुरक्षित करून होणारा धोका टाळावा, अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर व स्थानिक नागरिक करीत आहेत.

Exit mobile version