| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील आयार मोह परिसरात महावितरण कंपनीचा विद्युत वाहक खांब सडलेल्या अवस्थेत असून, पावसाळा सुरू होण्या अगोदर खांब बदलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आयार मोहल्ला परिसरात एका घरा लगत महावितरण कंपनीने विद्युत वाहक खांब उभारला आहे. वर्षानुवर्षे घरा लगतचा खांब बदलण्यात आला नाही. खांबाच्या पायालगत बंद अवस्थेतील वीज वितरण बिंदू (डीपी) आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या विद्युत वाहिन्यांचा त्रास पादचाऱ्यांना होत आहे. विद्युत वाहक खांबाची जीर्ण अवस्था झाली असून, पायाजवळ सडलेला खांब कधीही कोसळू शकतो. महावितरण कंपनीने श्रीवर्धन शहरात पावसाळी पूर्व कामांना सुरुवात केली असून, हा सडलेल्या अवस्थेतील खांब बदलावा, जेणेकरून पावसाळी दिवसांत विद्युत वाहक खांब कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये. अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत.







