रसायनीच्या आदित्य खंडीझोडची फ्रान्समध्ये दमदार कामगिरी
| रसायनी | प्रतिनिधी |
फ्रान्समधील बूलोन-सुर-मेर येथे झालेल्या 2026 च्या जागतिक सवात आसो स्पर्धेत 43 देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सी.के.टी. महाविद्यालयातील एस.वाय.बी.कॉम.चा विद्यार्थी आणि मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट अकादमीचा खेळाडू आदित्य अमोल खंडीझोड याने केले. पदकाने हुलकावणी दिली असली तरी जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना आदित्यने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या कामगिरीची छाप उमटवली.
या स्पर्धेसाठी आदित्यला भारताचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेदरम्यान आदित्यची लढत सेनेगल आणि तुर्कीच्या खेळाडूंशी झाली. युरोपियन भूमीवरील ही त्याची पहिलीच जागतिक स्पर्धा असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्र, रणनीती, शिस्त आणि स्पर्धात्मक वातावरणाचा मोलाचा अनुभव मिळाला.
मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड गेल्या 20 वर्षांपासून पनवेलमधील सी.के.टी. महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. आपल्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवून जागतिक स्पर्धेच्या व्यासपीठावर नेण्याचे त्यांचे स्वप्न फ्रान्समधील या स्पर्धेमुळे महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहे. या प्रवासात भारतीय आंतरराष्ट्रीय पंच व जागतिक स्पर्धेचे पंच नवज्योत बरजोत यांचेही मार्गदर्शन लाभले. पदक मिळाले नसले तरी 43 देशांतील अनुभवी खेळाडूंशी झालेली थेट लढत आदित्यच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. आगामी जागतिक स्पर्धेसाठी अधिक कठोर आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण घेऊन भारतासाठी पदक मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे आदित्यने सांगितले.







