रिया मालुसरे यांनी जिंकली पुणेकरांची मने
| खोपोली | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातून पुढे येत मॉडेलिंग, अभिनय आणि फॅशन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिसेस रायगड’ विजेत्या रिया मालुसरे यांनी पुणे-पिंपरी चिंचवड येथील भव्य सोहळ्यात आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. पुण्याच्या मंचावर त्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत खालापूरसह रायगडच्या नावलौकिकात आणखी भर घातली.
खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावच्या रिया मालुसरे यांनी 2024 मध्ये खारघर येथे झालेल्या सोहळ्यात ‘मिसेस रायगड’चा किताब पटकावला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रायगडचे प्रतिनिधित्व करत आपल्या कलागुणांची छाप उमटवली आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सौंदर्य, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात मोठे व्यासपीठ मिळू शकते, हे त्यांनी आपल्या प्रवासातून दाखवून दिले आहे.
2 ऑक्टोबर रोजी वीरा डान्स, मॉडेलिंग अँड फिटनेस अकॅडमीतर्फे महेश गायकवाड यांच्या आयोजनाखाली पिंपरी चिंचवड येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रिया मालुसरे यांना ‘फेस ऑफ द शो’ म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मॉडेलिंग, अभिनय आणि फॅशन क्षेत्रातील कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत रंगमंचाची रंगत वाढवली. तब्बल एका वर्षानंतर रिया मालुसरे पुन्हा रंगमंचावर झळकल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वावराला आणि सौंदर्याला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
‘मिसेस रायगड’चा किताब मिळवल्यानंतर रायगडचे प्रतिनिधित्व करत पुण्याच्या मंचावर झळकणे हा रिया मालुसरे यांच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. मॉडेलिंग, अभिनय आणि विविध फॅशन इव्हेंट्सच्या माध्यमातून त्या सातत्याने आपल्या टॅलेंटची वेगळी छाप उमटवत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या रिया मालुसरे यांनी पुण्याच्या मंचावर सौंदर्य, आत्मविश्वास आणि कलागुणांची खास झलक दाखवत खालापूरसह रायगडचा नावलौकिक उंचावला आहे.







