| खरोशी | वार्ताहर |
नवभारत साक्षरता कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पेण तालुक्यातील वडखळ केंद्रांतर्गत कांदळे 5, खपाचीवाडी 6, इंद्रनगर 9, वडखळ आदिवासीवाडी 10 व गडब 9 अशा 39 निरक्षर व्यक्ती, तर पाबळ केंद्रातील गवळावाडी येथे 4 अशा एकूण 43 निरक्षर व्यक्ती साक्षर होण्यासाठी परीक्षा देत आहेत, अशी माहिती पेण पंचायत समिती साधन व्यक्ती निलेश मानकवळे यांनी दिली.
पंधरा वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या निरक्षरांकडून पायाभूत साक्षरतेसह लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिहाय बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गटस्तरीय, केंद्रस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत. केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 17) पायाभूत साक्षरता आणि मूल्यमापन चाचणी घेण्यात आली.
पायाभूत चाचणी ही वाचन, लेखन, आणि संख्याज्ञान अशा तीन भागांसाठी प्रत्येकी 50 प्रमाणे 150 गुणांची ऑफलाईन होणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान 33 गुण आवश्यक आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित असणार आहेत. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासाचा असून. दिव्यांग व्यक्तीसाठी तीस मिनिटे जास्त वेळ दिला जाणार आहे. परीक्षार्थी परीक्षेसाठी जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतः चा आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी सोबत घ्यायचा आहे. तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. परीक्षा मराठी माध्यमातून होणार आहे. उत्तीर्णांना गुणपत्रक/प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख तसेच ज्या ठिकाणी परीक्षा चालू आहे तेथील मुख्याध्यापक यांच्या योग्य नियोजनातून काम चालू असून, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पेण तालुक्यात भेट दिली. तर, उर्वरित ठिकाणी संघटनेचा बहिष्कार असल्यामुळे नवसाक्षरतेची परीक्षा नाही.
निलेश मानकवळे,
पेण पं.स. साधनव्यक्ती
आजच्या परीक्षेवर जिल्ह्यातील सर्वच संघटनांचा रितसर बहिष्कार असल्यामुळे कोणीही परीक्षा घेणार नसल्याचे लेखी पत्र देऊन सांगितले आहे. पेण तालुक्यात 17 पैकी 15 केंद्रांत आमचा कायमचा बहिष्कार आहे व यापुढेही असाच राहणार.
प्रमोद पाटील,
अध्यक्ष, अ.भा. प्राथमिक शिक्षक संघ कोकण विभाग