| रेवदंडा | प्रतिनिधी |
फौजी असल्याची बतावणी मोबाईलद्वारे करून वीस टक्के कमिशनच्या आमिषाने फोन पे च्या माध्यमातून चौल मधील कॉटेज धारकांस तब्बल 43 हजार रूपयांचा आर्थिक चुना लावून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत रेवदंडा पोलिसाकडे तक्रारी नुसार माहिती तंत्रज्ञानाव्दारे आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौल तुलाडदेवी येथील कॉटेज धारक अनिल महादेव नाईक यांना कॅप्टन विकास पटेल व सुभाषचंद्र फौजी (दोन्ही राहणार कोल्हापूर) या नावाने भारतीय सैनेत फौजी म्हणून कार्यरत असून सहा इसमाकरीता तीन रूम भाडयान मिळविण्यासाठी संपर्क केला. यांनी ओळखपत्र व स्मार्ट कार्ड पाठवून अनिल नाईक यांना पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी आर्मी कार्यालयाकडून 20 टक्के डिस्काउंट रूम भाडयात मिळते अशी बतावणी करून फोन पे अॅप ओपन करण्यास सांगितले. पैसे आगाऊ भरायचे असल्याचे सांगून फोन पे व्दारे प्रथम 14,400 रुपये रक्कम मागवून तुमची रक्कम परत पाठवितो अशी बतावणी केली, त्यानंतर त्यांनी पुन्हा 28 हजार 600 रक्कम मागितली, असे एकूण 43 हजार रूपये फोन पे व्दारे परत देण्याची बतावणी करून मागविले. त्यानंतर फौजी कॅप्टन विकास पटेल व सुभाषचंद्र फौजी यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने अज्ञात इसमाने बनावट नावाने आर्थिक फसवणूक केल्याचे अनिल महादेव नाईक यांचे लक्ष्यात येताच, त्यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.