44 टोल रद्द करण्याची मागणी

| मुंबई | वार्ताहर |

राज्यातले जुणे 44 टोल बंद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली आहे, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. बैठकीत टोल या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज बोलत होते. 44 टोल बंद करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.

त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 15 जुन्या टोलनाक्यांचा समावेश आहे. तसेच मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी समुद्रमार्ग इत्यादी ठिकाणी असणाऱ्या टोलचे कॅगमार्फत ऑडिट केले जाणार आहे. ठाण्यात झालेली टोल दरवाढ रद्द करण्यासाठीही सरकारने एक महिन्याची मुदत मागितली आहे, असे राज यांनी सांगितले. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारावर येत्या 15 दिवसात सरकार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत. त्याची कंट्रोलरुम मंत्रालयात असणार आहे. या ठिकाणी मनसेही सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. त्यामुळे नेमकी किती वाहने येतात आणि जातात याची माहिती उपलब्ध होईल, असेे राज यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आजपासूनच कामाला लागलो आहोत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला, तर त्यावर सरकारने कॅबिनेट मंत्रीमंडळात निर्णय घ्यायचा असतो. भुसे हे राज यांच्या घरी गेल्याने समांतर सरकार चालवले जाऊ शकते, असा संदेश जनतेला दिला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

Exit mobile version