जलजीवन मिशनची 496 कामे पूर्ण

रायगड जिल्हा परिषदेचा दावा

। रायगड । खास प्रतिनिधी ।

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार 496 पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी 617 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, 43 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे, असा दावा रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.

जलजीवन मिशन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लीटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत 617 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात 43 योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार, अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.

– डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Exit mobile version