राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण

। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव आता चिंताजनक ठरू लागला आहे. कारण आज एका दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजाराने वाढला आहे. तर एकट्या मुंबईत 8 हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आज पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.संसर्गाचा वेग जास्त असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले 50 नवे रुग्ण आज राज्यात सापडले आहेत. त्यातील 36 रुग्णांची नोंद एकट्या पुण्यात झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 8 रुग्ण सापडले आहेत. राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 510 झाली आहे. त्यापैकी 193 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एका रुग्णाचा पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Exit mobile version