| उरण | प्रतिनिधी |
दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मी दिव्यांगांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. गव्हाण पंचक्रोशीतील अनेक दिव्यांगांना मी मदतीचा हात दिला आहे. ज्या दिव्यांग पालकांची मुले आमच्या यमुना सामाजिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाईल. दिव्यांगांचे प्रश्न वेगळे आहेत; परंतु अडीअडचणीला सुखकर्ताचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला आहे. कारण दिव्यांगांना मदत करताना मी झुकते माप देतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले.
गव्हाण येथील शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेतर्फे बुधवारी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामसेवक विजयकुमार राठोड, ॲड.रेखा चिरनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिव्यांगांना दारिद्य्ररेषेखालील रेशन कार्ड आणि उत्पन्नाचे दाखले महेंद्रशेठ घरत आणि मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी रेखा चिरनेरकर म्हणाल्या, शहरातील दिव्यांगांपेक्षा ग्रामीण भागातील दिव्यांगांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. येत्या काळात दिव्यांगांसाठी विशेष शाळा सुरू करण्याचे प्रयोजन आहे. दिव्यांगांना जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. यावेळी शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष सचिन कोळी, खजिनदार जनार्दन कोळी, सचिव कांचन कोळी आणि सभासद उपस्थित होते.अशोक कोळी यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
दिव्यांगांची उपस्थिती
गव्हाण येथील शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेतर्फे बुधवारी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.यावेळी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
