पुजा पारधीचे सोशल मिडियावर 50 हजार फॉलोअर्स

मी हाय माथेरानची युट्युब वाली

| माथेरान | वार्ताहर |

चिकाटी आणि जिद्दीने आपल्या छोट्याशा गावासह पर्यटन नगरी माथेरानचे नाव युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यात नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार्‍या माथेरानच्या पायथ्याशी आदिवासी वाडीत राहणार्‍या पूजा परशुराम पारधी या मुलीने सुरू ठेवला आहे.

हाशाची पट्टी हे आदिवासी गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येते. गावातील सर्वांचाच उदरनिर्वाह माथेरानवर अवलंबून असतो. 2018 मध्ये टिकटॉक अँप आला होता त्यावेळी पूजा हिने विविध ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली. नुकताच तिने मी हाय माथेरानची युट्युब वाली हे अप्रतिम गाणे युट्युब वर सादर केले आहे. युट्युब वर तिचे 51000 सबस्क्रायबर असून इन्स्टाग्रामवर एक लाख सत्तावीस हजार इतके फॉलोअर्सवर आहेत. हे गाणे पुजाची आई लीला परशुराम पारधी या अशिक्षित असताना सुध्दा त्यांनी हे गाणे तयार केले होते. त्या गाण्यावर पुजाचे आदिवासी मित्र निलेश निरगुडे, शशी, सोनू आणि रोहित वाघ यांनी साथ दिली आहे. पुजाचे वडील परशुराम पारधी हे माथेरान मध्ये येऊन मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत. सुरूवातीला पूजाच्या या आवडीला काही लोकांनी आक्षेप घेतला होता. मुलींनी नाचगाणी करू नये असे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात येत होते. परंतु आपल्या आवडीवर पुजा ठाम आहे.

गाण्यातून समाजप्रबोधन
गाण्यातून अथवा भटकंती करून आदिवासी वाड्यातील परिस्थिती, संस्कृती त्याचप्रमाणे आजही अनेक वाड्यात रस्ते नाहीत, समाजात काही ठिकाणी बालविवाह पद्धत आजही कायम आहे ती बंद झाली पाहिजे, समाजातील विचारांत बदल घडवून आणण्यासाठी आपला हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे पूजा सांगत आहे. स्वतःच्या गावात त्याचप्रमाणे माथेरान, कर्जत तालुक्यातील विविध भागात, पुणे, नाशिक येथील विडिओ सुध्दा काढून त्या त्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी पुढाकार घेत आहे. शिवकालीन किल्ल्यावर जाऊन तेथील माहिती लोकांसमोर आणत आहे. माथेरान वर निस्सीम प्रेम असणार्‍या आणि पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत असलेल्या पूजा पारधी हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version