| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये ई-रिक्षा पुन्हा सुरू व्हावी आणि समर्थनार्थ 17 मार्च रोजी माथेरान बंदची हाक माथेरान पर्यावरण संवेनशील फोरम यांनी दिली होती. त्यामुळे माथेरानमधील बाजारपेठ बंद होती. घोडे वगळता अन्य सर्व आर्थिक व्यवहार बंद होते.
या बंदमुळे माथेरानमधील मुख्य बाजारपेठ असलेली महात्मा गांधी रस्त्यावरील बाजारपेठ तसेच हुतात्मा भाई कोतवाल मार्केट आणि पिसरनाथ मार्केट या ठिकाणी कडकडीत बंद ठेवला होता. तसेच माथेरानमधील रस्त्यांवर असलेले लहान दुकानदार आणि प्रेक्षणीय स्थळांचे ठिकाणी असलेले दुकानेदेखील आजच्या बंदमध्ये सहभागी असल्याने तेथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले असल्याचे दिसून आले. मात्र, या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त माथेरान पोलीस ठाणे यांच्याकडून ठेवण्यात आला होता.