पापलेट जोडी रु 1200/-; कोळी बांधवांनादेखील मोठी झळ
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
समुद्रात मासळी मिळत नसल्याने मुरूडच्या मासेमारी नौका किनार्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. होलिकोत्सवानंतरदेखील मासळी मिळत नसल्यामुळे मच्छिमारांवर मोठ्या नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. मुरूडच्या मार्केटमध्ये काही प्रमाणात अलिबाग, रेवदंडा येथील मासळी येत असल्याचे शनिवारी दिसून आले. उपलब्ध मासळी घेण्यासाठी ग्राहकांबरोबरच येथील कोळी बांधवदेखील येत असल्याचे दिसून आले. बर्याच दिवसांपासून येथे अशीच परिस्थिती आहे. मासळी कुठे गायब झाली हेच मच्छिमारांनादेखील कळायला मार्ग नाही. अनेकजण बाहेरगावहून आणण्यात येणार्या सुक्या मासळीकडे वळलेले दिसत आहेत. बाहेरगावाहून येणारी मासळीचे भाव गगनाला भिडले असून, एका पापलेट मासळीच्या जोडीचा भाव रु. 1200/- ते 1500/- इतका असल्याचे मार्केटमध्ये फिरताना दिसून आले. सर्वसामान्य ग्राहकांना पापलेट खरेदीचा विचार करणेदेखील अवघड बनले आहे. मार्केटमध्ये बांगडे, कोलंबी, रावस, काटेरी मासळी, मांदेली अशी मासळी उपलब्ध होत असून, याचे प्रमाण फक्त 30 टक्केच दिसून येते.
मुरूडच्या समुद्रात किंवा आजूबाजूच्या खाडीपट्टीत मासळीचे दुर्भिक्ष्य असून, ‘खामदे’ गावची येणारी सफेद कोलंबीदेखील विक्रीस येत नाही. मुरूड तालुक्यातील पारंपरिक मासेमारी पूर्णपणे ठप्प असून, मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे दिसून येत आहे. परीक्षा सुरू असल्याने सध्या पर्यटकांची वर्दळ दिसत नाही. मासळी हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे खाद्य आकर्षण आहे; मात्र येथील ताज्या मासळीची उपलब्धता नसल्याने आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसत आहे. उपलब्ध मासळीचे दर अटकेपार असल्याने अनेकांना अखेर चिकनकडे वळावे लागत आहे. अवकाळी वादळी पावसाचे संकटाचा सामना करणेदेखील मुश्कील बनले आहे. शनिवारी मार्केटमध्ये फक्त दोन ते तीन ठिकाणी काही पापलेट जोड्या दिसून आल्या; परंतु भाव परवडणार्या पलीकडे दिसले. कोळी मच्छिमार मंडळींवर मिळेल ती मासळी घेण्यासाठी मार्केटमध्ये यावे लागत असल्याचे एकदरा येथील हनुमान मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी शनिवारी बोलताना सांगितले.