एकदरा पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ५ कोटी मंजूर

आ जयंत पाटील यांच्या प्रश्नावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आगरदांडा व राजापूरीसह अनेक गावांना जोडणाऱ्या मुरुड तालुक्यातील एकदरा पुलाची दुरवस्था झाली असल्याबाबत शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. सदर पुलाची दुरुस्ती अथवा नवीन पुल उभारण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकदरा पूलाच्या काही घटकांचे क्रॉक्रिट नादुरुस्त झाले आहे. तथापि, पूल वाहतूकीस सुरळीत आहे. त्यामुळे सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले आहेत. सदर कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी आपल्या प्रश्नात विचारले की, सुमारे ६५ वर्षांपूर्वी एकदरा पूल मुरूड-एकदरा खाडीवर बांधण्यात आलेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या ३० वर्षांत सदर पुलाची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पूल धोकादायक झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सदर पुलाच्या बीमचे प्लास्टर निखळले असून अनेक ठिकाणी गंजलेल्या सळ्या दिसू लागल्या आहेत तर संरक्षक कठडेदेखील मोडकळीस आले आहेत, सदर पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून महाडच्या सावित्री पुलासारखी भयंकर दुर्घटना घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेली ३० वर्षे पुलाची दुरुस्ती न करणाऱ्या संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच सदर पूलाच्या दुरूस्तीसाठी अथवा त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना व कार्यवाही केली आहे. याची विचारणा केली. आ जयंत पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पूलाच्या काही घटकांचे क्रॉक्रिट नादुरुस्त झाले आहे. तथापि, पूल वाहतूकीस सुरळीत आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीची रक्कम रुपये ५ कोटींचे काम मंजूर करण्यात आले आहे. अंदाजपत्रक व निविदा विषयी कार्यवाही पूर्ण करुन दुरुस्तीचे काम लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version