। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
वेंगुर्ले येथील दिवाणी न्यायालयात 27 जुलैला झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व वादपूर्व 31 अशी एकूण 51 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील मिळून एकूण 13 कोटी 78 लाख 6 हजार 773 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघटना, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे शनिवारी (दि.27) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तालुक्यातील दिवाणीकडील 2 प्रकरणे, फौजदारी कडील 18 प्रकरणे, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विवीध बँका व विद्युत विभाग, वेंगुर्ले यांच्याकडील 31 वादपूर्व प्रकरणे अशी 51 प्रकरणे तडजोडीने मिटविली. पॅनेलप्रमुख म्हणून न्यायाधीश रायरीकर व पॅनेल सदस्य म्हणून अॅड. पूनम नाईक यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक, एस. एस. कांबळे, एस. के. खेडेकर आदी सहभागी झाले.