अहिल्यानगरमध्ये 24 जिल्ह्यांचे 870 खेळाडू मैदानात उतरणार
| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या व अहिल्यानगर जिल्हा खो-खो संघटना यांच्या मान्यतेने अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा थरार गुरुवार (दि.4 ) श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर, अहिल्यानगर येथील मैदानावर 4 ते 7 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. संपूर्ण शहरात खो-खो क्रीडा वातावरणाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र संघाची निवड कर्नाटक येथे होणाऱ्या 44 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणार आहे. प्रत्येक जिल्हा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांतील तब्बल 870 खेळाडू व प्रशिक्षक सहभागी होणार असून, चार मैदानांवर सामने रंगणार आहेत. सर्व यंत्रणा, व्यवस्था, निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा आणि मैदानाची तयारी पूर्ण झाल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी 6 वाजता झाले. याप्रसंगी अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा. युवा मोर्चा महिल्यानगर (दक्षिण) संचालक-जिल्हा सहकारी बँक, राधाकृष्ण विखे पाटील, , संग्रामभैय्या जगताप, पंकज आशिया, जिल्हाधिकारी, सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, आदी मान्यवरांच्या उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार, डॉ. चंद्रजित जाधव, सचिन गोडबोले, ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खो-खोच्या वेग, चपळाई आणि रणनीतीने सजलेल्या या रोमांचक स्पर्धेत कोण ठरणार अजिंक्य? कोण मिळवणार महाराष्ट्राचा मान आणि राष्ट्रीय स्पर्धेची तिकीट? हे पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पर्धेतील गटवारी पुढीलप्रमाणे :
मुले गट
अ गट : धाराशिव, रायगड, पालघर
ब गट : सांगली, नंदूरबार, छ. संभाजीनगर
क गट : सोलापूर, जालना, सिंधुदुर्ग
ड गट : पुणे, धुळे, लातूर
इ गट : अहिल्यानगर, बीड, परभणी
फ गट : ठाणे, मुंबई उपनगर, हिंगोली
ग गट : नाशिक, रत्नागिरी, जळगाव
ह गट : मुंबई, सातारा, नांदेड
मुली गट
अ गट : धाराशिव, रायगड, परभणी
ब गट : सांगली, नंदूरबार, बीड
क गट : सोलापूर, धुळे, लातूर
ड गट : ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग
इ गट : नाशिक, पालघर, छ. संभाजीनगर
फ गट : मुंबई उपनगर, सातारा, नांदेड
ग गट : पुणे, अहिल्यानगर, हिंगोली
ह गट : रत्नागिरी, जालना, जळगाव







