व्यावसायिकाकडून 53 लाखांची खंडणी;दोघांना अटक


। पनवेल । वार्ताहर ।
ओळखीचा फायदा उचलत दोघा खंडणीखोरांनी नवीन पनवेल भागात राहणा़र्‍या एका व्यवसायिकाला खोट्या गुह्यात अडकवण्याची तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून तब्बल 52 लाख 41 हजाराची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदानंद वाकुर्ले व प्रथमेश वाकुर्ले अशी या खंडणीखोरांची नावे असुन खांदेश्‍वर पोलिसांनी या दोघा खंडणीखोरांना सापळा लावून अटक केली आहे.

या प्रकणातील तक्रारदार राजेश पटेल (50) हे नवीन पनवेल सेक्टर-3 भागात राहण्यास असून त्यांचे त्याच परिसरामध्ये मेडीकल शॉप आहे. त्यांच्याकडे मिलींद जाधव हा मागील 14 वर्षापासून कामाला असून त्याचा मेव्हणा सदानंद वाकुर्ले हा मिलींदला भेटण्यासाठी येत असल्याने त्याची आणि पटेल याची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे सदानंद हा देखील सदर मेडीकल दुकानात येऊन बसत होता. दरम्यान, श्रवणकुमार जैस्वाल हा देखील पटेल यांच्याकडे अनेक वर्षापासून काम करत होता. मात्र त्याने काही महिन्यापूर्वी स्वत:चे मेडीकल शॉप सुरु केले होते. श्रवणकुमार हा पटेल यांचे ग्राहक त्याच्याकडे वळवून त्यांचे नुकसान करत असल्याचे सदानंद याने पटेल यांना सांगितले होते.

तसेच त्याबाबत श्रवणकुमारला समज देणार असल्याचे सांगत सदानंद हा श्रवणकुमार याच्या मेडीकल दुकानात समज देण्यासाठी गेला होता. यावेळी श्रवणकुमार आणि सदानंद या दोघांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर सदानंद याने आपल्या साथीदारांच्या मदतीने श्रवणकुमारला मारहाण देखील केली होती. त्यानंतर सदानंद याने खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे तसेच पोलिसांना मॅनेज केल्याचे पटेल यांना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानंतर श्रवणकुमार याला मारहाण करणार्‍या व्यक्तींना 5 लाख रुपये द्यायचे आहेत असे सांगुन सदानंद याने पटेल यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती.

त्याला पैसे न दिल्यास त्यांना जेलमध्ये जावे लागेल. तसेच त्यांच्या सांगण्यावरुन त्याने श्रवणकुमारला मारहाण केल्याचे सांगितले. पैसे दिले नाहीस तर तो व त्याचे मित्र पोलिसांना त्यांचे नाव सांगतील. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावेल अशी भिती घालण्यास सुरुवात केली. मात्र पटेल यांनी त्याला नकार दिल्यानंतर सदानंद याने आपल्या मित्रासह पटेल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन पटेल यांनी 3 लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतर सदानंद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची पोलिसांकडे खोटी तक्रार देत त्यांना अडकविण्याची धमकी दिली.

पटेल यांना रिव्हॉल्वर व रिव्हॉल्वरच्या गोळ्या दाखवुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. अशा पद्धतीने सदानंद वाकुर्ले, त्याची पत्नी भाग्यश्री वाकुर्ले व भाऊ नितीन वाकुर्ले या तिघांनी पटेल यांना धमकावून त्यांना वेगवेगळी कारणे सांगुन त्यांच्याकडुन मागील दिड वर्षात तब्बल 52 लाख 41 हजार रुपयांची रक्कम उकळली. मात्र त्यानंतर देखील सदानंद वाकुर्ले याने पटेल यांना धमकावुन त्यांच्याकडुन आणखी 5 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.

सदानंद याच्या सततच्या या धमकीला वैतागुन पटेल यांनी गत महिन्यात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी सापळा लावुन सदानंद याला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार पटेल यांनी गत 19 नोव्हेंबर रोजी सदानंद याला 50 हजार रुपये घेण्यासाठी आपल्या मेडीकल दुकानाजवळ बोलावुन घेतले. त्यानुसार सदानंद आपल्या भावासह पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याने पटेल यांच्याकडुन रक्कम स्विकारल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी सदानंद वाकुर्ले व प्रथमेश नानु वाकुर्ले या दोघांविरोधात खंडणीसाठी धमकावणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.

Exit mobile version