दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नऊ लाखांहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेत 59 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी शनिवारी (दि.7) जिल्ह्यातील 2,323 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान सुरू झाल्यानंतर सात ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था केल्याने हा प्रश्न अल्पावधीत मार्गी लावण्यात आला. कामार्ले परिसरात किरकोळ वादाची घटना वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 57.77 टक्के मतदान नोंदविण्यात आले. एकूण 9 लाख 82 हजार 374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी सोमवारी (दि.9) सकाळी दहा वाजता तालुका स्तरावर विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी एकूण 502 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. प्रारंभी काही केंद्रांवर अल्प प्रतिसाद दिसून आला, तर काही ठिकाणी सकाळपासूनच मतदारांची मोठी गर्दी झाली. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील सहाण, महाडमधील सांदोशी तसेच पोलादपूरमधील दोन केंद्रांसह एकूण सात मतदान केंद्रांवर मशीन बिघाड झाला. काही ठिकाणी 15 मिनिटे, काही ठिकाणी पाऊण तास, तर काही ठिकाणी तब्बल एक तासानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली.
दोन-दोन तासांच्या अंतराने मिळालेल्या आकडेवारीनुसार, सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत 11.5 टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत 27.52 टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत 44.86 टक्के आणि साडेतीन वाजेपर्यंत 57.77 टक्के मतदान झाले. एकूण 17 लाख 381 मतदारांपैकी साडेसात ते साडेतीन या वेळेत 9 लाख 82 हजार 374 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 4 लाख 91 हजार 402 पुरुष आणि 4 लाख 90 हजार 969 महिला मतदारांचा समावेश आहे. महिलांपेक्षा 433 पुरुषांनी दुपारपर्यंत अधिक मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुरेंद्र म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, सानिका घरत, कावीर पंचायत समितीचे उमेदवार अनिल पाटील, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, मापगावचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, निखिल मयेकर, मोहन धुमाळ, अंजली पाटील, संदीप गायकवाड यांच्यासह विविध भागातील महाविकास आघाडी व शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण तसेच विविध संस्थांचे आजी-माजी सदस्य यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मशीनमध्ये बिघाड
सहाण येथील मतदान केंद्रात मशीन बिघाड झाल्याने मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मशीन उपलब्ध झाल्यानंतर पाऊण तासाने मतदान पुन्हा सुरू झाले. अलिबागसह सहा तालुक्यांमध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमध्ये बिघाड आढळला. सुधागड तालुक्यात दोन ठिकाणी अशी समस्या निर्माण झाली होती. एकूण सात मशीन बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वैद्यकीय किटची सुविधा
सध्या थंडीचा हंगाम असला तरी दुपारच्या कडक उन्हाचा विचार करून मतदान केंद्रांवर मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागाकडून वैद्यकीय किटची व्यवस्था करण्यात आली होती. आशा वर्कर, आरोग्य सेविका आणि इतर आरोग्य कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात होते. अनेक केंद्रांवर वैद्यकीय कक्षही उभारण्यात आले होते.
मंडपाअभावी मतदार, कर्मचारी उन्हात मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, अलिबाग तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर मंडपाचा अभाव असल्याने मतदारांना उन्हात उभे राहावे लागले. पोलीस व कर्मचारी यांनाही सावलीसाठी अन्य घरांचा आधार घ्यावा लागला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस, एसआरपी, होमगार्ड यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रापासून 50 ते 100 मीटर परिसरात अनावश्यक वावरास बंदी होती. वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांग, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात आली होती. काही संवेदनशील केंद्रांवर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी होती.
व्हीव्ही पॅट मशीनचा अभाव
विधानसभा निवडणुकीदरम्यान व्हीव्ही पॅट मशीनचा वापर करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत व्हीव्ही पॅटचा वापर करण्यात आला नसल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मतदान नेमके कोणाला झाले, याची खात्री मतदारांना करता आली नाही, यामुळे काहींनी शंका उपस्थित केल्या.
आशा सेविकांची नाराजी
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही मतदान केंद्रांवर नियुक्त आशा सेविकांना आरोग्य किट उपलब्ध न झाल्याचा आणि मानधन न मिळाल्याचा आरोप समोर आला आहे. दिवसभर बूथवर उपस्थित राहूनही नाव व पद नोंद नसल्याने तसेच स्पष्ट सूचनांचा अभाव असल्याने सेविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. इतरांना मानधन मिळाले, मात्र आम्हाला मिळाले नाही, अशी तक्रार काही सेविकांनी केली. निवडणुकीसारख्या जबाबदारीच्या कामात आवश्यक सुविधा न मिळाल्यास कामावर परिणाम होऊ शकतो, अशी भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
