‘आयपीएल’च्या महालिलावात 590 खेळाडूंवर होणार बोली

धवन, श्रेयस, कमिन्स, रबाडा, मार्श, स्मिथ अव्वल श्रेणीत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी महालिलावासाठी दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या अव्वल श्रेणीत सलामीवीर शिखर धवन, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन या भारतीय खेळाडूंसह पॅट कमिन्स आणि कॅगिसो रबाडा या परदेशी वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.बेंगळूरु येथे 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार्‍या या महालिलावात 590 खेळाडूंवर बोली लागणार आहे. संघांनी खेळाडूंची पसंती दर्शवल्यानंतर गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेली 1214 खेळाडूंची यादी कमी झाली.


मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे या भारताच्या अनुभवी खेळाडूंचाही दोन कोटी रुपये मूळ रकमेच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत एकूण 48 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय इशान किशन, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, गतहंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज हर्षल पटेल, फिरकी गोलंदाज यजुर्वेद्र चहल आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर या युवा भारतीय खेळाडूंवर लक्षवेधी बोली लागण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू मिचेल मार्श, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डयुप्लेसिस या अव्वल श्रेणीतील परदेशी खेळाडूंवरही संघांचे लक्ष असेल. या श्रेणीत अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पाची निराशा होण्याची शक्यता आहे. दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या दुसर्‍या श्रेणीत 20 खेळाडूंचा आणि एक कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या तिसर्‍या श्रेणीत 34 खेळाडूंचा समावेश आहे.

भारताच्या युवा (19 वर्षांखालील) संघातील कर्णधार यश धूल, विकी ओस्टवाल आणि रवींद्र हंगर्गेकर यांच्यासह शाहरूख खान, दीपक हुडा आणि आवेश खान हे खेळाडू लिलावात छाप पाडतील, अशी आशा आहे. दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर हा लिलावातील सर्वात वयस्क खेळाडू आहे, तर अफगाणिस्तानचा नूर अहमद हा 17 वर्षीय खेळाडू सर्वात युवा खेळाडू आहे. नूर सध्या युवा विश्‍वचषक स्पर्धेत खेळत आहे.

Exit mobile version