बीडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भरधाव एसटी बस आणि मालमोटारीच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे अंबाजोगाई – लातूर रस्त्यावरील बर्दापूर फाट्याजवळ घडली. जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील बर्दापूर ( ता. अंबाजोगाई ) फाट्याजवळ रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि मालमोटारीची समोरासमोर धडक झाली. लातूर औरंगाबाद बस ( क्रं. एमएच 20 , बीएल 3017 ) लातूर येथून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याजवळ एका वळणावर दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला.


अपघात एवढा भीषण होता की बसचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मालमोटारीचा समोरील भाग एसटी बस मध्ये घुसल्याने बस एका बाजूने कापली गेली होती. सकाळच्या सुमारास दाट धुके होते. त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. मयत आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version