। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या पाच वर्षात 6 लाख नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द केंद्र सरकारनेच ही माहिती दिली आहे. मात्र, या नागरिकांनी देशाचं नागरिकत्व का सोडलं याची माहिती देण्यात आलेली नाही.
केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. राय यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 1,33,83,718 नागरिक परदेशात राहत आहेत. 2017 मध्ये 1,33,049 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. तसेच 2018 मध्ये 1,34,561 नागरिकांनी, 2019 मध्ये 1,44,017 नागरिकांनी, 2020मध्ये 85,248 नागरिकांनी आणि 30 सप्टेंबर 2021पर्यंत 1,11,287 नागरिकांनी नागरिकत्व सोडलं आहे, अशी माहिती राय यांनी दिली.
तर गेल्या पाच वर्षात 10,645 नागरिकांनी भारताचे नागरिकत्व मिळावं म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी 4177 लोकांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. भारताचं नागरिकत्व मिळावं म्हणून 227 अमेरिकन, 7782 पाकिस्तानी, 795 अफगानिस्तानी आणि 184 बांग्लादेशी नागरिकांनी अर्ज केला होता, असंही त्यांनी सांगितलं.