। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गांसाठी होणार्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे.
सर्वच पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसून कार्यरत आहेत. जाहिर सभांपेक्षा घरोघरी प्रचारफेर्या करुन मतदारांना गाठून मत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 18 जानेवारीला मतदान होणार असून प्रचारासाठी रविवार दि. 16 जानेवारी ही अंतिम मुदत असून सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढून तो शिगेला पोहचला आहे.
6 नगरपंचयातींच्या 21 जागांसाठी 60 उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात आपले नशिब आजमावत आहेत. सहा पैकी खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्यात सरळ लढत होईल. माणगावसाठी 4 प्रभागातील 4 जागांसाठी 10 उमेदवारांमध्ये निवडणूक रिंगणात लढत रंगणार आहे. म्हसळा नगरपंचायतीसाठी रिंगणात 8 उमेदवार लढा देत आहेत. पोलादपूरात चार प्रभागातून 16 उमेदवार चार जागांसाठी लढत आहेत.
तळा नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी 14 जणांमध्ये लढत रंगणार आहे. पालीत 14 उमेदवारांमध्ये 4 जागांसाठी लढाई होईल. या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल.