आरोग्य विभागाला हा भार सोसवेना..

जि.प.मध्ये 616 जागा रिक्त; अतिरिक्त भारामुळे कर्मचारी मेटाकुटीस

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर सेवा देत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचा समावेश आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 50 टक्क्‌‍याहून अधिक पदे रिक्त असल्याने रायगडकरांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होताना दिसत आहे. राजिपच्या आरोग्य यंत्रणेमध्ये असणाऱ्या रिक्त पदांचा ताण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पडत आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना पदरमोड करून खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या आरोग्य विभागामध्ये तब्बल 616 पदे रिक्त आहेत. हा भार सोसवेना अशी या विभागाची झालेली दिसते.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 मधील मंजूर असणाऱ्या 1 हजार 137 पदांपैकी 521 पदांची पद भरती शासनाने केली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला सुदृढ बनविणारी तब्बल 616 पदे रिक्त आहेत. रिक्तपदे तातडीने भरून आरोग्य यंत्रणेला बुस्टर मिळावा यासाठी यंत्रणांचे प्रयत्न आहेत. संबंधित यंत्रणांनी वारंवार रिक्तपदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु रिक्तपदांचे लागले ग्रहण गेले अनेक वर्षांपासून सुटलेले नाही.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यातील 53 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 288 आरोग्य उपकेंद्रांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविली जाते. रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एक हजार 137 पदांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 616 पदे रिक्त आहेत. रिक्त असणाऱ्या पदांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 मधील कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग 1 आणि वर्ग दोन मधील 14 पदे रिक्त आहेत. यामध्ये 1 अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, 1 जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, 1 सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, 5 तालुका वैद्यकीय अधिकारी, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 साथ रोग अधिकारी, 1 जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, 1 प्रशासन अधिकारी, 1 सांख्यिकी अधिकारी, 8 अवैद्यकीय पर्यवेक्षक, 7 आरोग्य पर्यवेक्षक, 18 औषध निर्माता, 3 प्रयोग शाळा तंत्रज्ञ, 10 कुष्ठरोग तंत्रज्ञ, 20 आरोग्य सहाय्यक, 390 आरोग्य सेवक, 2 प्रशिक्षित दाई आणि 19 स्त्री परिचार यांचा समावेश आहे. याचबरोबर आरोग्य विभागात अपेक्षित असणाऱ्या परिचारिका, अधिपरिचारिका यांचीही असंख्य पदे रिक्त आहेत.

सुविधांचा अभाव
जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 288 उपकेंद्र आहे. यातील आरोग्य केंद्र असणार्या ठिकाणी नेमणुकीस असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी निवासी तत्वावर काम करावेत, असे आदेश आहेत. अनेक ठिकाणी हे वैद्यकीय अधिकारी राहत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असणाऱ्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांना राहण्यासाठी इमारती नाहीत. काही ठिकाणी इमारती आहेत, तर त्या ठिकाणी स्वच्छता गृह आणि विजेचा प्रश्न आहे. यामुळे आरोग्य संस्थेत काम करणार्या अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासाच्या सुविधेचा विषय आता नव्याने समोर आला आहे.

सीईआंकडून गंभीर दखल
पेण तालुक्यातील जाते प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्प दंश प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून वैद्यकीय अधिकारी यांचा निलंबन व चौक्शीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेत त्यांना कडक शब्दात सुचना वजा आदेश दिले आहेत.

सर्व डॉक्टरांनी मुख्यालयात राहावे, मुख्य सोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, विशेष करून गरोदर महिलांना प्रसुतीच्या आरोग्य सुविधा द्यावेत, असे आदेश देत यापुढे पूर्व सुचना ने देता कोणत्याही दिवशी वैद्यकीय अधिकारी यांची व्हिसी घेवून ते मुख्यालयात राहतात की नाहीत, हे तपासण्यात येणार आहे.

डॉ. भरत बास्टेवाड, सीईओ, रायगड
Exit mobile version