महाराष्ट्राचा मतटक्का घसरला
| मुंबई | प्रतिनिधी |
देशामध्ये शुक्रवारी (दि.26) लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यातील आठ, तर देशातील 12 राज्यांतील 88 मतदारसंघांतील उमेदवरांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. सर्व मतदार संघात वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झाले. तर, यापैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.71 टक्के मतदान झाले. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा आठ मतदारसंघात मतदान पार पडले. दुसर्या टप्प्यातही राज्यातील मतदानाचा टक्का काहीसा घसरल्याचे दिसून आले.
देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 88 मतदारसंघात दुसर्या टप्प्यातील मतदान पार पडले. यासाठी 16 कोटी मतदार पात्र होते. पण, त्यापैकी सुमारे 9 कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 9 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी तर 7 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव होते. यामध्ये केरळमधील सर्व 20 मतदारसंघातील मतदान पूर्ण झज्ञले. तर महाराष्ट्रातील 8 मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसर्या टप्प्यातील आसाममधील 5, बिहारमधील 5, छत्तीगडमधील 3, कर्नाटकमधील 14, मध्यप्रदेशातील 7, महाराष्ट्रात 8, मणिपूर 1, राज्यस्थानात 13, त्रिपुरा 1, उत्तरप्रदेश 8, पश्चिम बंगाल 3, आणि जम्मू काश्मिरमध्ये एका मतदारसंघात आज मतदान पार पडले.
ईव्हीएम कुर्हाडीने फोडले नांदेड लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर एका तरुणानं ईव्हीएम मशीनची कुर्हाडीनं तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार घडला. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात हा प्रकार घडला. भय्यासाहेब येडके असे ईव्हीएम फोडणार्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. पण त्यानं हे कृत्य का केलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पण या घटनेमुळं या तरुणामध्ये निवडणुकीबद्दल एकूणच राग असल्याचं दिसून आलं आहे.
प्रमुख उमेदवारांचे भवितव्य कैद राज्यातील प्रकाश आंबेडकर (अकोला), नवनीत राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरातील ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, ए.डी. कुमारस्वामी, शशी थरुर, भूपेश बघेल, केसी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्त्वाच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले. सात टप्प्यातील पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांसाठी गेल्या शुक्रवारी म्हणजेचे 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.