2 हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016/17 ते 2021/22 या मागील सहा वर्षात जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून 7 हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी 2 हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश घुले यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व आदिम जमाती घरकुल योजना या घरकुल योजना राबविण्यात येतात. यामधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणार्या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो.
2016/17 ते 2021/22 या मागील सहा वर्षात जिल्ह्याला 9 हजार 813 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामधील 9 हजार 675 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 7 हजार 333 घरकुले बांधून पूर्ण झाली असून, 2 हजार 480 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
घरकुल योजनेचा ग्रामीण दृष्टिक्षेप
योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र शासनाकडून व 40% निधी राज्य शासनाकडून प्राप्त होतो. योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणा-या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांची निवड ही आर्थिक सामाजिक जात सर्वेक्षण 2011 नुसार व प्रपत्र ड नुसार प्राधान्यक्रमाने करण्यात येते. घरकुल बांधकामासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान स्वरूपात घरकुलाच्या प्रगतीनुसार देण्यात येते. तसेच मनरेगा अभिसरण स्वरूपात 90/95 दिवसाचा रोजगार अकुशल स्वरूपात जवळपास रूपये 18 हजार रुपये व शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रूपये 12 हजार रुपये असे एकूण 1 लाख 80 हजार रुपये अनुदान देण्यात येते.