रायगडच्या 70 लालपरी सिल्वासा सहलीवर

शेकडो फेर्‍या रद्द; प्रवाशांचे बेहाल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

परीक्षा संपून शाळेला सुट्टी पडली असतांना  ऐन सुट्टीच्या कालावधीतच रायगड जिल्ह्यातील 6 डेपो मधील 70 गाड्या सिल्वासाला पाठविण्यात आल्याने एसटीच्या शेकडो फेर्‍या रद्द करण्यात आल्याने लालपरीने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलवासा येथील दौऱ्यासाठी सिल्वासा प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार रायगड विभागातून एसटी बस पाठविण्यात येणार असल्याचे समजते. मात्र एसटी प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे सांगत सिल्वासा प्रशासनाच्या मागणीनुसार एसटी बसेस पुरविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील 70 एसटीच्या बसेस गुजरात मधील सिल्वासा येथे पाठविण्याकरिता मुंबई येथील एसटीच्या  मुख्यालयातून प्रासंगिक करार करण्यात आले आहेत.  24 ते 26 एप्रिलपर्यंत 3 दिवस या गाड्या प्रासंगिक करारानुसार पाठविण्यात आल्या आहेत.  त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, माणगाव व कर्जत या डेपोमधील 70 एसटीच्या गाड्या सिल्वासा येथे पाठवण्यात आल्या आहेत.

पेण आगारामधील 18 गाड्या सिल्वासाला पाठवण्यात आल्याने पेण डेपोमधील एसटीच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आले आहेत. पनवेल, ठाणे, मोहपाडा, लोणावला, खोपोली, खारपाले, पाली, महागाव, मुंगोशी, खेमवाडी, घोटे, दादर, शिर्कीचाळ, दुरशेत, उर्णोली, कणे या गावांसह सुमारे 30 ते 35 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रवाशांना मात्र याचा फटका बसला आहे. तब्बल 3 दिवसांकरिता एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्याने खाजगी वाहतूकदारांनी मात्र प्रवाशांची आर्थिक लूट करायला सुरुवात केली आहे.

पेण डेपो प्रमाणेच जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, मुरुड, माणगाव, कर्जत या डेपो मधून विविध ठिकाणी होणार्‍या एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. महिलांना एसटीच्या तिकिटामध्ये शासनाने 50% सवलत दिल्याने महिलांची प्रवासी संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग, जेष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व इतर अनेकांना एसटीच्या सवलती असल्याने अनेक प्रवासी एसटीनेच प्रवास करणे पसंत करतात. अगोदरच एसटीकडे कमी गाड्या असताना एसटीच्या गाड्या सिल्वासाला पाठवल्याने जास्तीचे पैसे देऊन प्रवाशांना इतर गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान अलिबाग आगारातून पाच बसेस पाठविण्यात आल्या असून त्याचा विशेष परिणाम नियमित फेऱ्यांवर झाला नसून सुट्टीच्या कालावधीत कमी भारमान असलेल्या मुळे आणि मालेगाव या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील 6 आगारामधून 70 एसटी बसेस  वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सिल्वासा येथे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे काही फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु  रायगड विभागामध्ये एकूण 400 एसटी बसेस असून त्या इतर 330 बसेस मधून प्रवाशांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.

दीपक घोडे, एसटीचे विभागीय नियंत्रक
Exit mobile version