70 मतदार करणार गृहमतदान

निवडणूक विभागाची तयारी पूर्ण; 85 वर्षांवरील 59 मतदारांची गृहमतदानाला पसंती

| नेरळ | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात आठ ते दहा मे रोजी गृहमतदान करण्याचे नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. मतदारसंघात 85 वर्षावरील 59 मतदारांनी आपल्या घरी मतदान करण्याची संतती दर्शवली आहे. तर, चालता तसेच हालचाल करता येणार नाहीत अशा 11 मतदारांचेदेखील त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जाणार आहे, अशी माहिती कर्जत विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांनी दिली आहे. दरम्यान, 43 गावांतील 70 मतदारांपर्यंत जाण्यासाठी खालापूर तालुका तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली टीम बनविण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी 85 वर्षावरील मतदारांच्या घरी निवडणूक यंत्रणेचे अधिकारी जाऊन मतदान करून घेण्याची योजना या निवडणुकीपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघातदेखील निवडणूक विभागाकडून 85 वर्षावरील मतदार आणि चालता येत नसलेले दिव्यांग मतदार यांच्याकडून संमती घेऊन गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्जत मतदारसंघात 3 लाख सहा हजार मतदार असून, त्यातील 5680 मतदार यांचे वय 85 वर्षे पेक्षा अधिक आहे. त्याचवेळी चालता न येणारे, डोळ्यांनी दिसत नसलेले तसेच शारीरिकदृष्ट्या व्यंग असलेल्या दिव्यांग मतदारांची संख्या ही 1016 एवढी आहे. त्यातील 70 मतदारांनी गृह मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यात 59 मतदार हे 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, तर 11 मतदार हे चालत येत नसलेले दिव्यांग मतदार आहेत. त्या 70 मतदारांनी संमती दिल्याने त्यांच्या घरी जाऊन मतदान पार पडले जाणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात (दि.13) मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी कर्जत मतदारसंघात खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी आयुब तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली पाच टीम तयार करण्यात आल्या असून त्यातील चार टीम या गृह मतदान करण्यासाठी 43 गावांचा दौरा करणार आहेत. या टीममध्ये मॅक्रो ऑबझर्व्हर, पोलिंग स्टेशन प्रमुख, त्यांना सहायक तसेच छायाचित्रकार, व्हिडीओ ग्राफर, पोलीस कर्मचारी अशी टीम असणार आहे.

43 गावात असलेल्या 70 मतदारांचे मतदान इव्हिम मशीनवर नोंदवून घेण्यासाठी रूट निश्‍चित करण्यात आला असून, त्याबद्दल सर्व माहिती संबंधित सर्व 70 मतदारांना देण्यात आली आहे. त्याचवेळी निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांनादेखील कल्पना देण्यात आली आहे, अशी माहिती कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी दिली आहे. 70 मतदारानाचे मतदान पूर्ण करून घेण्यासाठी तीन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. 85 वर्षे वयावरील अन्य 5621 मतदार हे (दि.13) मे रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचवेळी मतदारसंघातील एकूण 1016 दिव्यांग मतदारांपैकी 11 मतदार हे गृह, तर अन्य 1005 मतदार हे आपल्या नजीकच्या मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

Exit mobile version