| म्हसळा | वार्ताहर |
ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.13) रुग्ण दगावल्याचा ठपका ठेवत वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश मेहता यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ श्रीवर्धन, म्हसळा येथील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शुक्रवारी (दि.15) बंद पुकारला होता. हा बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचे दोनही तालुक्यात दिसून आले.
म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथील विंचू दंश झालेला चार वर्षांचा मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावला, असा ठपका ठेवत ग्रामीण रुग्णालय म्हसळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश मेहता यांना दवाखान्यातच संतप्त जमावाकडून बुधवारी (दि. 13) मारहाण करण्यात आली. एखाद्या डॉक्टरवर हल्ला म्हणजे समस्त वैद्यकीय व्यावसायिकांच्या कर्तव्य दक्षतेवर हल्ला समजून आजचा बंद करण्यात आल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी संप मागे घेऊन त्वरित दवाखाने आणि खासगी लॅब उघडण्यात याव्या, या उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी लेखी पत्राद्वारे केलेल्या आवाहनाला सर्वच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रतिसाद देत आपले दवाखाने उघडून रुग्णसेवा सुरू केली. दरम्यान, घडलेल्या घटनेपासून डॉ. मेथा यांचे हॉस्पिटल बंद आहे. तालुक्यातील अनेक लहान-थोर रुग्णांवर उपचार डॉ. मेथा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. अनेक रुग्णांना काय उपचार द्यायचे, हे डॉ. मेथा यांना पूर्णपणे माहीत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी डॉ. मेथा यांनी आपला व्यवसाय पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी केली आहे.