| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेला जिल्ह्यातून पाचवीचे 6 हजार 522 तर आठवीचे 4 हजार 692 असे एकूण 11 हजार 214 विद्यार्थी सामोरे गेले होते. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील 7 हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 6 हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी 1 हजार 258 विद्यार्थी पात्र ठरले असून, 375 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या वर्गातील 5 हजार 82 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 4 हजार 692 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. तर 518 विद्यार्थी पात्र ठरले. तसेच 342 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमधील या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.