रायगडातील 738 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

। रायगड । प्रतिनिधी ।

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून पाचवीचे 9 हजार 964 तर आठवीचे 7 हजार 27 असे एकूण 16 हजार 991 विद्यार्थी सामोरे गेले होते. यामध्ये दोन्ही वर्गातील 738 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अभिनंदन केले आहे.

18 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 30 एप्रिल 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता. 30 एप्रिल ते 10 मे 2024 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील 10 हजार 379 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 9 हजार 964 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी अंतिम निकालानंतर 375 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या वर्गातील 7 हजार 333 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 7 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील अंतिम निकालानंतर 342 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमधील या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.

अलिबाग तालुक्यातील 64 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, कर्जत 30, खालापूर 37, महाड 125, माणगाव 70, म्हसळा 5, मुरुड 8, पनवेल 193, पेण 50, पोलादपूर 17, रोहा 59, सुधागड 7, श्रीवर्धन 7, तळा 12, उरण 53 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

Exit mobile version