ओम् वर्तकनगर महिलांच्या चौथ्या फेरीत
| ठाणे | प्रतिनिधी |
जय भारत स्पोर्टस्, स्वराज्य स्पोर्टस्, मिड लाईन यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या 73व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत तिसरी फेरी, तर ओम् वर्तकनगरने चौथी फेरी गाठली. पुरुषांत शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड लाईन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. अश्वमेघ संघाला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी 5-5 चढाईच्या डावापर्यंत लढत द्यावी लागली.
ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य पटांगणावर सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या अश्वमेघ संघाने 5-5 चढायात बाळ गोपाळ मंडळाचा प्रतिकार मोडून काढत आगेकूच केली. पूर्वार्धात पिछाडीवर पडलेल्या अश्वमेघने पूर्ण डावात बरोबरी साधली. नंतर 5-5 चढायात बाजी मारली. अश्वमेघच्या आदित्य पांडेने 5-5 चढयातील आपल्या 2ऱ्या चढाईत 3 गडी टिपत संघाचा विजय निश्चित केला. त्याला गणेश रणनवरे, हर्षल शिंदे, शुभम पांडे यांची उत्तम साथ लाभली. बाळ गोपाळच्या पंकज फाटक, अमित शहा, दिपू तिवारी यांचा जोश 5-5 चढाईत किंचितसा कमी पडला.
श्रीराम विश्वस्त संघाने पहिल्या डावातील 16-23 अशा 7 गुणांच्या पिछाडीवरुन श्री विठ्ठल मंडळाचा विरोध 41-38 असा संपुष्टात आणला. अक्षय मकवाना, चिन्मय गुरव, सिद्धेश पाणीचाळ यांच्या चतुरस्त्र खेळाने पहिल्या डावात श्री विठ्ठल संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना टिकविता आली नाही. पण श्रीरामच्या तुषार शिंदे, हर्ष काळे, आदित्य पात यांनी टॉप गिअर टाकत विरुद्ध संघावर 2 लोण देत 3गुणांनी बाजी पालटविली. जय बजरंग- वाशिंद संघाने वीर परशुराम संघावर मॅट केली. विराज शिंदे, आशिष पाटील यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महिलांत ओम् वर्तकनगरने अमर हिंद मंडळाला मात करीत चौथी फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 2 लोण देत आघाडी घेणाऱ्या वर्तकनगरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.







