तालुक्यातील बहुतांशी गावातील 85 ते 90 टक्के क्षेत्र बाधित;
विकासकांनी पाठ फिरविल्याने विकासावर परिणाम
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील तसेच दिघी-पुणे-बंगळुरू या महत्त्वाच्या मार्गावर असणारे उत्तर कोकणातील विकासाच्या उंबरठ्यावरील महत्त्वाचे शहर म्हणून माणगाव तालुका ओळखला जातो. त्यामुळे हा तालुका महामार्ग-जलमार्ग आणि लोहमार्गमुळे दळणवळणातून जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. विळे-भागाड येथील हजारो हेक्टवर विकसित होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे माणगाव तालुका हा झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर यामुळे ते नजीकच्या काळात विकासाची आर्थिक राजधानी बनण्याच्या मार्गावर असतानाच तालुक्यातील 74 गावांना पूररेषेचा फटका बसत असून, बहुतांशी गावातील 85 ते 90 टक्के क्षेत्र बाधित झाले असून, याकडे विकासकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे.
माणगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा कसलाही धोका नाही. तरीही ही गावे पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. जे पूर बाधित क्षेत्र आहे. त्यावर विकासकामांना शासनांनी बंदी घातली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव, निजामपूर, लोणेरे, चिंचवली, नांदवी, मोर्बा, माणगाव यासह अनेक गावांचा झपाट्याने विकास होत असताना या महत्त्वाच्या गावातील 85 ते 90 टक्के क्षेत्र पूररेषेत बाधित होत आहे. उर्वरित अनेक गावातील कमी- जास्त प्रमणात क्षेत्र बाधित होत आहे. या पूररेषेमुळे 74 बाधित गावांचा विकास खुंटत चालला असून, तेथे प्रचंड प्रमाणात निर्माण होणार्या रोजगारावर कुर्हाड बसली आहे.
माणगाव तालुका मुख्यालय असल्याने विविध सरकारी कार्यालये, उपजिल्हा रुग्णालये, पंचायत समिती, जिल्हा न्यायालय, विळे-भागाड एम.आय.डी.सी., दिघी पोर्ट, रोहा, नागोठणे, महाड येथील औद्योगिक क्षेत्र तसेच महामार्ग, रेल्वेमार्ग यामुळे या तालुक्यात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध असताना पूर रेषेचा अनेक गावांना फटका बसत असल्याने विकासाला मर्यादा येत असून विकास कसा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पूरदर्शक रेषेतील गावे
उतेखोल, नाणोरे, कळमजे, बामणोली, खांदाड, भादाव, ढालघर, माणगाव गारळ, लोणशी, निलगुण, मांगवली, सुरव, खरवली, सुरव तर्फे तळे, राजिवली, नाईटणे, बोर्ले, सुर्ले, गांगवली, उबर्डी, शिरवली, सांगी, येळवडे, येरद, तासगाव, कडापे, कांदळगाव खुर्द, कांदळगाव बुद्रुक, बोंडशेत, भाले, निजामपूर, कोशिंबळे, पाणस्पे, कोस्ते बुद्रुक, कालवण, दाखणे, कोस्ते खुर्द, खर्डी बुद्रुक, पाणोसे, मोर्बा, देगाव, पाचोळे, वावे, चापडी, तळेगाव तर्फे गोरेगाव, रेपोली, कुरवडे, उणेगाव, दहिवली तफे गोरेगाव, दहिवली कोंड, शिरवली तर्फे गोरेगाव, तारणे तर्फे गोवले, वडवली, वडगाव, वडगाव तर्फे गोरेगाव, उसरघर, न्हावे, पन्हळघर तर्फे अंबर्ले, पहेल, लोणेरे, चिंचवली तर्फे गोरेगाव, गोरेगाव, खांडपाले, नागाव, टेमपाले, हुर्डी, वाकी, काचले, पूरार, भिंताड, लाखपाले, मूर, नांदवी.