तळाेजा मदरशात 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
| रायगड | खास प्रतिनिधी |
देशातील सरकारी, निमसकारी, वित्तीय संस्था, शाळा महाविद्यालयांमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतानाच तळाेजा येथील मुस्लिम धर्मियांनी देशभावना आणि जातीय सलाेखा जागृतीचे पाऊल टाकले आहे. दारुल उलूम इस्लामिया अरबिया या मदरशामधील 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमा दरम्यान संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भाषण देऊन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि “सारे जहाँ से अच्छा” हे गाणे गायले. मदरशात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. भारतीय स्वतंत्र लढा, हिंदू मुस्लिम एकता, जातीय सलोखा, देशाच्या विकासात तरुणांचे योगदान, मदरशा सारख्या शैक्षणिक संस्थांचे समाज आणि देशा घडवण्यासाठी योगदान, व्यसना मुळे होणारे दुष्परिणाम यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मुलांनी भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य, देशातील एकता आणि एकात्मता यावर प्रकाश टाकणारी उत्कृष्ट भाषणे दिली. भारतातील विविध जाती, पंथ आणि धर्माच्या लोकांमधील सांप्रदायिक सलोख्यावर या कार्यक्रमाद्वारे विशेष संदेश देण्यात आला.
दरम्यान, भारताचा स्वातंत्र्यलढा, हिंदू-मुस्लिम एकता तसेच जातीय सलोख्याची गरज यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदरशाचे अध्यक्ष जैद पटेल, शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.