शेकापक्ष आणि आघाडीला अनुकूल मतदान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होत असलेल्या पाली, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा आणि खालापूर या नगर पंचायत क्षेत्रातील स्थगित नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागां अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आज मतदान झाले. सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी 78.09 इतकी आहे. मंगळवारी (18 जानेवारी) अमाप उत्साहात मतदान झाले. 102 पैकी 21 प्रभागात हे मतदान घेण्यात आले.यासाठी 60 उमेदवार आपले भवितव्य आजमाविण्यासाठी उभे आहेत. या सहा नगरपंचायतींसाठी 10 हजार 026 मतदारांपैकी 7 हजार 829 मतदारांनी हक्क बजावला. कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. दरम्यान, खालापूर मध्येबजावला विकासकामांच्या जोरावर स्वबळावर लढणार्या शेकापक्षाचे उमेदवार संतोष जंगम यांचा या निवडणूकीत एकतर्फी विजय होईल असे बोलले जाते. त्यांच्यासमोर सर्व पक्षांनी आघाडी केली असली तरी जनमताचा कौल त्यांच्या बाजूने असेल असा होरा आहे. तर पाली, माणगावमध्ये शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाच विजय मिळणार असल्याची चर्चा आहे. पोलादपूर, म्हसळा आणि तळा नगरपंचायतीत शेकापला अनुकूल वातावरण असल्याचे समजते.
पाली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. 85.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 17 पैकी 4 प्रभागात ही निवडणूक झाली.
4 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. 2 हजार 222 पैकी 1 हजार 908 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
खालापुरात नगरपंचायतीच्या एका जागेसाठी सरासरी 76.49 टक्के मतदान झाले. एकूण 353 मतदारांपैकी 270 मतदारांनी मतदान केले. तळा नगरपंचायतीची निवडणुसाठी 75.26 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 प्रभागात ही निवडणूक झाली. 4 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम बंद झाले. 1 हजार 463 पैकी 1 हजार 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
म्हसळ्यात 69.49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 जागांसाठी एकूण 8 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. 1 हजार 511 पैकी 1 हजार 050 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पोलादपूरमध्येही मतदानाला चांगला प्रतिसाद लाभला. 86.28 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1 हजार 152 पैकी 994 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. माणगावमध्ये मंगळवारी 75.37 टक्के मतदानाची नोंद झाली. 4 जागांसाठी एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 हजार 325 पैकी 2 हजार 506 मतदारांनी मतदान केले. मतदान पुर्ण झाल्यानंतर आता मतदार राजा हा कोणाला कौल देणार हे उद्या 19 जानेवारी रोजी मतमोजणी दरम्यान समोर येणार आहे.