युवा संघातील 8 खेळाडू आयपीएलला मुकणार?

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताच्या युवा संघाने युवा विश्‍वचषक पाचव्यांदा जिंकण्याचा पराक्रम वेस्ट इंडीजमध्ये करून दाखवला. या संघातील अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. त्यामुळे या संघातील बरेच खेळाडू आयपीएलच्या यंदाच्या लिलावात धुमाकूळ घालतील असे अनेकांना वाटले होते. मात्र भारताच्या युवा संघातील तब्बल 8 खेळाडूंच्या आड बीसीसीआयचा एक नियम आला आहे.


बीसीसीआयच्या या नियमानुसार निदान एक प्रथम श्रेणी सामना किंवा लिस्ट ए चा सामना खेळेलेल्याच युवा संघातील खेळाडूंना आयपीएल लिलावात सहभागी होता येते. जर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसेल तर त्यांना 19 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट बघावी लागते. या नियमामुळे विश्‍वविजेत्या युवा भारतीय संघातील विकेट किपर दिनेश बना, उपकर्णधार एस. राशीद, डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार, अष्टपैलू निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी, मानव पारख आणि गर्व सांगवान यांना फटका बसणार आहे. यातील बर्‍याच खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे.


दरम्यान, बीसीसीआयने याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेट फारसे झालेले नाही. त्यामुळे बोर्डातील अनेक अधिकार्‍यांना या नियमात सूट द्यावी असे वाटते. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफी येत्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. जर या खेळाडूंना त्यांच्या राज्याच्या संघांनी आपल्या रणजी संघात स्थान दिले तरी ते 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार्‍या आयपीएल लिलावावासाठी पात्र होणार नाहीत.

या खेळाडूंना प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामने खेळायला मिळाले नाहीत हे दुर्दैवी आहे. देशांतर्गत क्रिकेटचा एक हंगाम कोरोनामुळे वाया गेला. बीसीसीआयने ही विशेष परिस्थिती लक्षात घ्यावी. या परिस्थितीमुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये. संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांची संधी हिरावून घेऊ नये. – रत्नाकर शेट्टी, माजी वरिष्ठ अधिकारी, बीसीसीआय.

Exit mobile version