दुकाने फोडणार्‍या 8 आरोपींना पेण पोलिसांनी केले गजाआड

25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी; नेरळ येथील चोरीचीही कबुली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पेण शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले 8 दुकाने एकाच रात्रीत फोडून रोकडवर डल्ला मारणार्‍या 3 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या कडून पोलिसांनी मुद्देमाल ही जप्त केला आहे अशी माहिती पेण पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातली पेण खोपोली मार्ग वरील जलाराम मेडीकल स्टोअर्स, डिमेलोज केक शॉप, साई राज स्वीट मार्ट, गावंड गुडवील इंटर प्रायझेसच्या हिमालया वेलनेस, रिंगरोड स्टोअर, स्वरा कलेक्शन, चिंतामणी जनरल स्टोअर, चावडीनाका येथील आईस्क्रीम पार्लर व मोबाईल शॉपी या 8 दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी 12 डिसेंबरच्या मध्यरात्री 36 हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केला होता.


दुकानांचे शटर वाकवून चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. 19 ते 22 वयोगटातील 4 चोर शटर वाकवताना व चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असताना सुध्दा त्यांचा तपास लागत नसल्याने पेण पोलिसां समोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या बरोबरच याच पेण खोपोली मार्गावरील एसबीआय बँकेचे एटीम वर दरोडा टाकून 56 लाख 34 हजार 800 रुपये घेऊन गेल्याने पेण पोलिसांवरील दबाव वाढला होता. अखेर पेण पोलिसांनी या चोरी प्रकरणी रवी तानाजी धनगर ( वय 19 वर्षे, रा.आंबिवली-कल्याण), राज विजय राजापूरे ( वय 21 वर्षे, रा.मध्यप्रदेश-इंदोर ), सुनील राम धरणगोयल ( वय 19 वर्षे, रा.आंबिवली-कल्याण ) या तीन आरोपींना अटक केली आली आहे. या घटनेतील चौथा संशयित आरोपी बाळकृष्ण पाल हा ठाणे, नौपाडा येथे अटक आहे. या आरोपींना पेण न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीं कडून 5 हजार 300 रुपये रोख रक्कम व चोरीतील मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच या आरोपींनी पेण येथून चोरी केलेली मोटार सायकल चोरी केल्याचा गुन्हा व नेरळ शहरात चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ उपनिरीक्षक मीनल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरांना गजाआड केले. पेण पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version