मागील वर्षापेक्षा दीड कोटींनी बजेट वाढले
| रायगड | खास प्रतिनिधी |
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेचा स्वउत्पन्नाचा 80 कोटी 80 लाख 80 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांनी सादर केला. मागील अर्थसंकल्पापेक्षा सदरचा अर्थसंकल्प एक कोटी 59 लाख 85 हजार 500 रुपये अधिकचा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करुन देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) सत्यजित बडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रसन्नजित राऊत, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी महादेव टेळे, लेखाधिकारी सतीश घोळवे, लेखाधिकारी प्रशांत जगताप उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात इमारत व दळणवळण कामांसाठी 19 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सामान्य प्रशासन 1 कोटी 92 लाख, शिक्षण 6 कोटी 62 लाख, पाटबंधारे 1 कोटी 22 लाख, सार्वजनिक आरोग्य 2 कोटी 11 लाख, ग्रामीण पाणीपुरवठा 11 कोटी 20 लाख, कृषी 2 कोटी 75 लाख, पशुसंवर्धन 3 कोटी 25 लाख, समाजकल्याण 12 कोटी 50 लाख, दिव्यांगकल्याण 3 कोटी 13 लाख, महिला व बालकल्याण 6 कोटी 25 लाख, संकीर्ण अंतर्गत ग्रामपंचायत विभागासाठी 2 कोटी 15 लाख तसेच अर्थसंकल्पात इतर खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात विशेष योजनांसाठी तरतूद
18 ग्रामपंचायतींना घंटागाडी देण्यासाठी : 2 कोटी
भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी : 25 लाख
दिव्यांग बांधवांना फिरता फुड मॉल देणे : 1 कोटी
शेतीत सोलर कुंपणासाठी 75 टक्के अनुदान : 23 लाख
विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरविणे : 10 लाख
मुलींना स्वसंरक्षण व शारीरिक विकास प्रशिक्षण : 20 लाख
7 वी ते 12 वी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण : 20 लाख
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, गायन, कथाकथन, अभिनय स्पर्धा आयोजित करणे : 10 लाख
–
2023-24 चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प
2023-24 चा अंतिम सुधारित 140 कोटी 40 लाख रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प बुधवारी मांडण्यात आला. मार्च 2023 मध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 79 कोटी 20 लाख 94 हजार 500 रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या मूळ अर्थसंकल्पात 61 कोटी 19 लाख 5 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.







