मैदान सुशोभिकरणासाठी 80 लाखांचा खर्च

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील ग्रामपंचायतीचे मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे सुशोभिकरणाचे काम प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमामधून सुरू आहे. या मैदानात असलेल्या संरक्षण भिंती बांधण्यासाठी आणि तेथील दोन खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 80 लाखांचा निधी मंजूर आहे. दरम्यान, सरकारी निधी लाटण्यासाठी मैदानाचे दुरुस्तीचे काम मंजूर आहे काय, असा प्रश्‍न नेरळकर उपस्थित करू लागले आहेत.

नेरळ ग्रामपंचायतीचे मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमामधून सुशोभिकरण कामे करण्यासाठी निधी मंजूर आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जात असून, त्यासाठी 80 लाख रुपये मंजूर आहेत. या निधीमधून शिवाजी महाराज मैदानाच्या संरक्षण भिंती बांधणे तसेच तेथील दोन खोल्यांची दुरुस्ती करणे ही कामे मंजूर आहेत. मात्र, एवढा मोठा निधी आलेला असताना नेरळ ग्रामपंचायतीला आपल्या मालकीच्या मैदानात कोणती कामे होणार हे माहिती नाही, याचे नवल वाटत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नेरळ ग्रामपंचायतीकडून छत्रपती शिवाजी महाराज मैदान सुशोभिकरण कामाबाबत ठराव घेतले आहेत, त्याचवेळी काम पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्ती करण्याचे ठरावदेखील घेतले आहेत. मात्र, तरीदेखील लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यादेश झालेल्या या कामाचे अंदाजपत्रक नेरळ ग्रामपंचायतीकडे नाही. ही बाब निश्‍चितच ठेकेदाराकडून शासनाचा निधी लाटण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

नेरळ ग्रामपंचायतीकडे कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता खिल्लारे यांच्याकडे चौकशी केली असता सदर कामासाठी 80 लाखांचा निधी आहे, याची माहिती समोर आली आहे.उपअभियंता खिल्लारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानाला संरक्षण भिंत बांधणे, जुन्या भिंतींची उंची वाढवणे तसेच मैदानात असलेल्या सभा मंडप यांची दुरुस्ती करून सुशोभीकरण करणे आणि तेथील दोन खोल्यांची दुरुस्ती करणे, ही कामे मंजूर आहेत. मैदानात असलेल्या दोन्ही खोल्या आजही सुस्थितीत असून, तेथे अंगणवाडी केंद्र सुरू असून, त्या खोल्यांवर असलेले स्लॅबदेखील सुस्थितीत आहेत. तर, दरवाजे आणि खिडक्यादेखील सुस्थितीत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या खोल्यांचे नक्की कोणते काम 80 लाखांच्या निधीमधून केले जाणार आहे, हा प्रश्‍नदेखील अनुत्तरित आहे. त्याचवेळी मैदानात असलेल्या जुन्या भिंती यांच्यावर नव्याने प्लास्टर करून त्यांना नवीन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे सुशोभिकरण काम सुरू आहे. त्यामुळे कदाचित सरकारी निधी लाटण्यासाठी हे काम सुरू आहे काय? असा प्रश्‍न नेरळकर यांच्या मनात निर्माण झाला आहे.

Exit mobile version