। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी तब्बल 10 कोटी 55 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नव्याने प्रस्तापित झालेल्या पाली नगरपंचायतमधील विकासासाठी यातील निम्म्याहून अधिक निधी मिळाला आहे. या भरघोस निधीमुळे सुधागड तालुक्यासह पालीच्या विकासाला गती मिळणार आहे. महाविकास आघाडी शासनातर्फे हा निधी उपलब्ध झाला आहे. सुधागड तालुक्यातील जनतेला मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधा पुरविण्यावर भर देत सतत निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राप्त निधीतून जिल्हा नियोजन नागरोत्थान व प्रादेशिक पर्यटन मार्फत 2 कोटी 64 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पाली शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व भुयारी गटारे निर्मिती होणार आहे. प्रादेशिक पर्यटन मार्फत मिळालेल्या एक कोटी निधीतून तलाव सुशोभीकरण होणार आहे. . नगरपंचायत नागरी सुविधा सहाय्यक योजने अंतर्गत 3 कोटी 20 लाख निधीतून पालीत विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. अल्पसंख्याक विकास निधी मधून मिळालेल्या साडेबारा लाखातून पालीतील कब्रस्तान,सुशोभिकरण होणार आहे. ओडीआर अंतर्गत मिळालेल्या अडीच कोटी निधीतून ग्रामीण भागातील रस्ते होणार आहेत. त्यामध्ये नागशेत, कोशिंबळे, घोटावडे आणि शिळोशी येथील रस्ते निर्मिती होणार आहे. 97 लाख मंजूर निधीतून तालुक्यातील विविध रस्ते, समाज मंदिर व साकव होणार आहेत. 68 लाख निधीतून तालुक्यातील पर्यटन विकास, रस्ते, शाळा दुरुस्ती व स्मशानभूमी शेड होणार आहे.