भातगिरणीच्या संपादित जागेची 84 लाख रुपये रक्कम मंजूर

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे विभागातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या मालकीच्या व महामार्गासाठी संपादित झालेल्या जागेचे तब्बल 84 लाख 29 हजार 274 रुपये एवढी रक्कम खा. सुनील तटकरे यांच्यामुळे नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी या संस्थेला मिळणार आहे. ही रक्कम मंजूर झाल्याचे पत्र खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे संचालक व सल्लागार मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले.

सुतारवाडी (ता.रोहा) येथील गीता बाग मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंजुरीचे पत्र देण्यासाठी संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला खा. सुनील तटकरे यांच्यासह नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे सल्लागार शिवरामभाऊ शिंदे, भाई टके, मधुकर ठमके, सभापती प्रभाकर ठाकूर, संचालक सदानंद गायकर, चंद्रकांत जांबेकर, चंद्रकांत गायकवाड, हिराजी शिंदे, बाळासाहेब टके आदींसह राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते दिपक पडवळ व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भातगिरणीला ही रक्कम मिळण्याचे सर्व अडथळे आता खा. सुनील तटकरे यांच्यामुळे दूर झाले आहेत. भातगिरणीच्या मालकीच्या परंतु मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी नागोठण्यातील हायवे नाका येथील उड्डाण पुलाच्या कामात संपादित झालेल्या भातगिरणीच्या सुमारे 13 गुंठे जागेच्या मोबदल्याची रक्कम खा. सुनील तटकरे यांच्यामुळे लवकरच भातगिरणीच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी भातगिरणीचे सल्लागार शिवरामभाऊ शिंदे यांनी खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, भुसंपादन विभाग तसेच भुमीअभिलेख कार्यालयात याप्रकरणी केलेला पाठपुरावाही महत्वाचा ठरला आहे.

दरम्यान नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर असलेल्या आणि महामार्गासाठी बाधित झालेल्या भातगिरणीच्या व्यावसायिक दुकान गाळ्यांचेही सुमारे 32 लाख रुपये काही वर्षांपूर्वी भातगिरणीला मिळाले होते. आता पुन्हा एकदा एवढी मोठ्या स्वरूपातील ही रक्कम सहकारी भातगिरणीला मळणार असल्याने भातगिरणीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्या रकमेचे सुयोग्य नियोजन सल्लागार व संचालक मंडळाची बैठक लावून करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरम्यान खा. सुनील तटकरे हे भातगिरणीच्या सर्वच विषयांत वेळोवेळी सहकार्य करीत असल्याने संचालक व सल्लागार मंडळाच्या वतीने खा. सुनील तटकरे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. तर खा. सुनील तटकरेंनी सहकारी भातगिरणीला वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे खा. तटकरेंच्या भव्य सत्काराचे आयोजनही लवकरच करण्यात येईल असेही संचालक व सल्लागार मंडळाकडून ठरविण्यात आले आहे.

Exit mobile version