| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी मर्यादित, नागोठणे या संस्थेची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे सभापती प्रभाकर ठाकूर यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन मार्गदर्शन केले. यावेळी विविध विषयांसह आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेला संस्थेचे सभापती प्रभाकर ठाकूर, सल्लागार भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, मधुकर ठमके, व्ही. के. जाधव, अनंत वाघ, दगडू दळवी (गुरुजी), संचालक चंद्रकांत जांबेकर, चंद्रकांत गायकवाड, एकनाथ जांबेकर, हिराजी शिंदे, रामचंद्र दगडू देवरे, सभासद अॅड. महेश पवार, चंद्रकांत भोईर, पांडुरंग जवके, सीताराम देवरे, सचिव अनंत पाटेकर, शिपाई रामचंद्र देवरे आदींसह अन्य सभासद उपस्थित होते.
या सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजूर करणे, तेरीज, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. वर्तमान पत्रात जाहीर सुचना देऊन सर्वच सभासदांना सभेची माहिती मिळत नसल्याने व आता कोरोनामुक्त वातावरण असल्याने सभासद सुधाकर जवके यांनी केलेल्या सूचनेनुसार नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या सभासदांची एक विशेष सभा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सभेस उपस्थित सभासदांचे सभापती प्रभाकर ठाकूर यांनी आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने या वार्षिक सभेचा समारोप करण्यात आला.