| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील कोलेटी (ता.पेण) येथील एक व्यक्तीला जमीन घेऊन देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपये उकळूनही त्या व्यक्तीला जमीन न मिळाल्याने पेण तालुक्यातील डोलवी, कांदलेपाडा व वडखळ येथील तीन जणांच्या विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उपलब्ध माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28 डिसेंबर 2018 ते 4 नोव्हेंबर 2019 च्या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. नागोठण्याजवळील कोलेटी ता.पेण येथील फिर्यादी मधुकर ठाकूर यांचे राहते घरात झालेल्या बैठकीतील चर्चेत या तीन आरोपींनी फिर्यादी मधुकर ठाकूर यांना शेतपळस ता.रोहा येथील सर्व्हे नं 23, हिस्सा नं.अ, क्षेत्र 0-51-90 या जागेमध्ये जमीन देण्यासाठी फिर्यादी यांचे नावे 1 गुंठा जागेसाठी दिलेले 3 लाख 10 हजार रुपये तसेच फिर्यादी यांचे वडिलांचे नावे जागेसाठी दिलेले 5 लाख रुपये व विटांचे 40 हजार रूपये अस 8 लाख 50 हजार रूपये रक्कम फिर्यादी यांच्याकडून स्वीकारुन ओरोपी क्र. 1 व 2 सर्व रा.पेण यांनी वचन चिठ्ठी लिहून देऊनही आजपर्यत जमीन फिर्यादी यांचे नावे खरेदी खत न करता संगणमताने रक्कमेचा अपहार करून फसवणुक केली आहे.
याबाबत रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सदर प्रकरणी नागोठणे पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 420, 406, 409 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास नागोठण्याचे पोलिस निरिक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.