| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील अरबी समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला मंगळवार दि.26 जुनपासून बंद होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि.25) जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा जेट्टी व दिघी बंदर या ठिकाणी राज्यभरातून 1,250 पेक्षा जास्त पर्यटकांनी गर्दी केली होती. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शिडाच्या व इंजिनच्या बोटींमधून ने-आण केली जाते. पर्यटन हंगामात शिडाच्या बोटींना चांगला व्यवसाय मिळत असतो. परंतु, आता मंगळवार पासून किल्ला बंद होणार असल्याने शिडाच्या बोटींसह स्थानिकांचा व्यवसाय ठप्प होणार आहे. पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले की, सोमवारी जंजिरा किल्ला पाहणाऱ्या पर्यटकांची खुप गर्दी दिसुन आली. त्यात 16 वर्षांवरील स्त्री-पुरुष पकडुन 850 जण, तर ऑनलाईन अंदाजे 400 पेक्षा जास्त संख्या होती. मात्र, 15 वर्षाच्या आतील मुला-मुलींना शुल्क माफ असल्याने त्यांची गणना करता आली नाही.






